दिल्ली प्रतिनिधी
National Testing Agency (NTA) ने 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या प्राथमिक चौकशी अहवालांनंतर आणि कायदा अंमलबजावणी संस्थांच्या निष्कर्षांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे NTA ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
NTA ने स्पष्ट केले की, परीक्षेच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून, प्रभावित तारखांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
यासोबतच, कथित गैरप्रकारांच्या सखोल चौकशीसाठी प्रकरण Central Bureau of Investigation (CBI) कडे सोपविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. NTA कडून चौकशीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, विद्यार्थ्यांचे आधीचे नोंदणी तपशील, परीक्षा केंद्रे आणि अर्ज कायम ठेवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. आधी भरलेले शुल्क परत करण्यात येईल आणि फेरपरीक्षा NTA च्या अंतर्गत संसाधनांद्वारे घेतली जाईल.
फेरपरीक्षेच्या नव्या तारखा आणि सुधारित प्रवेशपत्रांचे वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे NTA ने सांगितले आहे. सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments