Type Here to Get Search Results !

३५ वर्षांची कर्तव्यनिष्ठ सेवा पूर्ण करून श्री. अशोकभाई भबुता सोनवणे यांची सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती.....

ग्रामसेवक अधिकारी - अशोक भाई भबुता सोनवणे 


ग्रामीण विकास प्रशासनात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुख कार्यशैलीचा ठसा उमटवणारे श्री. अशोक भबुता सोनवणे (ग्रामपंचायत अधिकारी) हे दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी शासकीय सेवेतून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले. तब्बल ३५ वर्षे ४ महिने ५ दिवसांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर त्यांनी आपल्या कार्याचा यशस्वी अध्याय पूर्ण केला. त्यांच्या निवृत्तीमुळे ग्रामपंचायत प्रशासनातील एक कर्तबगार, अभ्यासू आणि संयमी अधिकारी निवृत्त झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

साध्या कुटुंबातून उंच भरारी..

श्री.अशोक भाई सोनवणे यांचे बालपण तालुका शहादा येथील बामखेडा त.त या गावात अत्यंत साध्या व कष्टकरी कुटुंबात गेले. त्यांचे वडील श्री. भबुता झिपरू सोनवणे व आई स्व. कांताबाई भबुता सोनवणे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. शेती व मजुरी करत असतानाही मुलगा शिकून मोठा व्हावा, ही त्यांची जिद्द होती. पालकांनी दिलेले कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिस्तीचे संस्कार हेच त्यांच्या यशामागील भक्कम आधार ठरले.

गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि शासकीय सेवेत प्रवेश मिळवला. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचा त्याग, चिकाटी आणि संस्कार यांचा मोठा वाटा असल्याची भावना ग्रामस्थ आजही व्यक्त करतात.

सेवाकार्याची सुरुवात आणि यशस्वी वाटचाल

श्री. अशोक भाई  सोनवणे यांनी दिनांक २३ ऑक्टोबर १९८९ रोजी पंचायत समिती राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा गाव कशेळी  येथे ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक म्हणून नियुक्ती स्वीकारली. सेवेत रुजू झाल्यापासून त्यांनी कामात काटेकोरपणा, वेळेचे भान आणि नियमांचे पालन यावर विशेष भर दिला.

यानंतर त्यांनी पंचायत समिती शहादा, जि. नंदुरबार  येथे डामरखेडा गावात दीर्घकाळ सेवा बजावत अनेक ग्रामपंचायतींचे प्रशासन सक्षम केले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते विकास, शासकीय योजना अंमलबजावणी आणि ग्रामसभांचे सुयोग्य आयोजन यासाठी ते ओळखले जात होते. शासकीय योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.

लोकाभिमुख आणि संयमी अधिकारी

श्री.अशोक भाई सोनवणे यांची कार्यशैली ही शांत, संयमी आणि सर्वांना सामावून घेणारी होती. नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या तातडीने मार्गी लावण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय होती. ग्रामसेवक, कर्मचारी आणि सरपंच यांच्याशी त्यांनी जपलेले सुसंवादाचे नाते हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रामपंचायतींनी आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि नियोजनबद्ध विकासाचा आदर्श निर्माण केला. प्रशासनातील शिस्तबद्धता आणि कागदपत्रांची अचूकता यासाठी ते विशेष प्रसिद्ध होते.

नोकरीसोबत समाजसेवेचा ध्यास

शासकीय सेवेसोबतच त्यांनी समाजकार्यालाही तितकेच महत्त्व दिले. सन २००३ मध्ये समाजाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी समाज संघटन व प्रगतीसाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल आठ वेळा सामुदायिक विवाह सोहळ्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

सुमारे १०० कुटुंबांचे विवाह लावून देत त्यांनी कन्यादानाचे पुण्य मिळवले. समाजातील आर्थिक भार कमी करण्यासाठी सामुदायिक विवाह ही प्रभावी चळवळ ठरली. तसेच समाजाची जनगणना करून समाज नियोजनावर भर दिला. या उपक्रमांमुळे समाजात शैक्षणिक जागरूकता, आर्थिक शिस्त आणि संघटनबळ वाढले असून आज समाजाची आर्थिक व शैक्षणिक प्रगती स्पष्टपणे दिसून येत आहे.

त्यांच्या या समाजाभिमुख कार्यामुळे ते केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजनेते ही ओळखले जातात.

सत्कार व गौरव

श्री.अशोक भाई सोनवणे याना ग्रामपंचायत अधिकारी या पदावर सेवा बजावत असताना पुरस्कार मध्ये डामरखेडा ग्रामपंचायतीला संतगाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग  नोंदवून सन 2006 ला जिल्हा पातळीवर तीसऱ्या क्रमांकाचे बक्षिस रक्कम 2 लक्ष रुपये.

त्यानंतर सन 2007 मध्ये दलित वस्ती स्वच्छ अभियान मध्ये डामरखेडा ग्रापं जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावून बक्षिस 5 लाख रुपये मिळविले. तंटामुक्त अभियान, निर्मल ग्राम अभियान,

तदनंतर अक्कलकुवा तालुक्यात तीन वर्ष सेवा बजावून सन2016 मध्ये नवानगर गांवाचा कारभार हाती घेतला. पाण्याचे दुर्भिक्ष लक्षांत घेऊन पाणी फाऊडेशन संस्थेमार्फत वाटर कप स्पर्धा मध्ये सहभागी होऊन ग्राप तीला तालुक्यात प्रथम क्रमांकाचे बक्षिस रक्कम रुपये 15 लक्ष मिळवून देण्यात सिहाचा वाय आहे. अश्या अनेक स्तरावर विविध पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले.

सेवानिवृत्ती निमित्त शहादा तालुक्यात विविध संघटना, ग्रामसेवक युनियन तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळातील प्रामाणिक सेवा, निस्वार्थ वृत्ती आणि कर्तव्यदक्षतेबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांनी आपल्या भाषणातून “कर्तव्य म्हणजेच पूजा” हा त्यांचा जीवनमंत्र अधोरेखित केला.

प्रेरणादायी जीवनप्रवास

साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून शिक्षण घेऊन शासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणारा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम, पालकांचे संस्कार आणि प्रामाणिक सेवा यामुळे कोणतेही ध्येय साध्य करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री. अशोक भाई भबुता सोनवणे होत.

त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी आणि समाधानी जीवनाच्या सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श भविष्यातील ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Post a Comment

0 Comments