Type Here to Get Search Results !

नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी NDDB आणि जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य करार...

नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी National Dairy Development Board (NDDB) आणि जिल्हा प्रशासन, नंदुरबार यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार NDDB अध्यक्ष डॉ. मीनेश शाह यांच्या आभासी उपस्थितीत पार पडला. यावेळी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि NDDB चे कार्यकारी संचालक S Rajeev यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण विकासावर भर:

या सहकार्याच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः महिला नेतृत्वाखालील गावपातळीवरील दूध उत्पादक संस्थांना बळकटी देणे, दूध उत्पादनक्षमता वाढविणे, दूध संकलन व हाताळणी व्यवस्थेत सुधारणा करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाला प्रोत्साहन देणे या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

दुग्ध विकासासाठी मोठी क्षमता:

यावेळी बोलताना डॉ. डॉ. मीनेश शाह यांनी नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध विकासासाठी मोठी क्षमता असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून NDDB सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.


दुग्ध क्षेत्र मजबूत करण्याची गरज:

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध क्षेत्र अधिक मजबूत करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. NDDB कडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे दुग्ध विकासाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

मुजकुवा येथे प्रात्यक्षिक पाहणी:

या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गुजरातमधील मुजकुवा येथे भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली. यामध्ये दूध संकलन केंद्र (DCS), सौरऊर्जा व बायोगॅस उपक्रम तसेच NDDB चे Genomics आणि OPU-IVF Laboratory यांची माहिती घेण्यात आली.

या भेटीत उपायुक्त पशुसंवर्धन संजय खाचणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तुषार गीते तसेच KPMG सल्लागार शशिकांत मराठे उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाच्या आधुनिक व शाश्वत विकासाला चालना मिळून महिला सक्षमीकरण, ग्रामीण उद्योजकता आणि शेतकरी उत्पन्नवाढीसाठी नवे दालन खुले होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



Post a Comment

0 Comments