शहादा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२G (NH-752G) वरील शिरूड चौफुली तसेच श्री साईबाबा मंदिर, नवीन प्रकाशा रोड परिसरात गतीरोधक बसविण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ च्या अधिकृत पत्रानुसार संबंधित ठिकाणी गतीरोधक उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महामार्गावरील या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः शिरूड चौफुली हा शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असून विद्यार्थी, नागरिक, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात. तसेच श्री साईबाबा मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांदरम्यान मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा वेग कमी करणे अत्यंत आवश्यक झाले होते.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या मागणीची दखल घेत उपनगराध्यक्ष हिंदू रणरागिणी आदरणीय सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागाशी वेळोवेळी संवाद साधून महामार्गावरील अपघातांची गंभीरता लक्षात आणून दिली. जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी ठाम भूमिका घेतल्याने अखेर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकृत पत्रानुसार आता संबंधित ठिकाणी गतीरोधक बसविण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून यामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल सौ. माधवीताई मकरंद पाटील यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. जनतेच्या हितासाठी प्रशासनाशी सातत्याने संवाद साधून ठोस निर्णय मिळविण्याची त्यांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Post a Comment
0 Comments