ई-केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाडकी बहीण योजनेतून हजारो महिला अपात्र ठरल्याचा प्रकार समोर आला होता. गेल्या काही पासून दीड हजार रूपयांचा लाभ बंद झाल्याने अनेक ठिकाणी लाडक्या बहिणी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. इतकेच नाही तर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनांचा भडका उडाल्याचेही चित्र दिसून आले. मात्र आशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सव पोस्ट करत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
ज्या लाडक्या बहिणींची e-KYC करणे बाकी आहे, तसेच ज्यांनी e-KYC पूर्ण केल्यानंतरही त्यांना योजनेचा लाभ मिळला नाही अशा लाभार्थी महिलांच्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत. अदिती तटकरे यांनी यासाठीची मुदत वाढवली जात असल्याची घोषणा केली आहे.
अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी! e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरूस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.
ई केवायसी का आवश्यक आहे?
या योजनेच्या खऱ्या लाभार्थी महिला आणि बनावट लाभार्थी यांच्यातला फरक ओळखणे यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी या योजनेचे काही बनावट लाभार्थी असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता ई केवायसी प्रक्रिया बंधनकारकर करण्यात आली आहे. केवायसी अपडेट केल्यानंतर दरवर्षी महिलांना त्यांची कागदपत्रं अपडेट करावी लागणार आहेत. त्यामुळे १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच छाननी करण्यात आल्यानंतर अनेक अपात्र महिलांनी आणि पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यामुळे अनेक महिलांना लाभ मिळणे तात्पुरते बंद झाले आहे.

Post a Comment
0 Comments