Type Here to Get Search Results !

सिकलसेलमुक्त समाजासाठी ‘अरुणोदय’; कोडीद येथे 'पावरा' भाषेतून जनजागृती व तपासणी संपन्न

 शिरपूर (धुळे): 

                 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे राज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद येथील दि. न. पाडवी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी व विशेष समुपदेशन शिबिर उत्साहात पार पडले.


             मातृभाषेतून संवाद: डॉ. हिरा पावरा यांचे मार्गदर्शनया शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हिरा पावरा यांनी उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थांना त्यांच्या 'पावरा' या मातृभाषेतून मार्गदर्शन केले. "सिकल सेल आणि आदिवासी समाज" या विषयावर बोलताना त्यांनी सिकलसेल म्हणजे काय, तो कसा होतो आणि तो आटोक्यात आणण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, यावर सखोल प्रकाश टाकला. विशेषतः 'लग्नाआधी सिकलसेल तपासणी' करणे भविष्यातील पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी कसे अनिवार्य आहे, हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत पटवून दिले. 

 शासकीय योजनांची  माहितीया वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडीच्या आरोग्य सहाय्यकांनी देखील मार्गदर्शन केले. सिकलसेल रुग्णांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना, उपचार पद्धती आणि आहाराबाबत यावेळी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी झालेल्या तपासणीनंतर आजच्या समुपदेशन सत्राने विद्यार्थ्यांमधील भीती दूर करण्यास मदत झाली.

             सदर मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत सोनवणे, जिल्हा सिकलसेल समन्वयक विलास वारुडे आणि तालुका समन्वयक ऋषीराज महाजन यांच्या नियोजनानुसार कोडीद उपकेंद्रात ही मोहीम यशस्वी झाली. सहकार्य व उपस्थिती

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेवक सागर पावरा, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा, शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील सर, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांनी मोलाचे सहकार्य केले. आदिवासी भागातील हा अनुवंशिक आजार मुळापासून संपवण्यासाठी 'अरुणोदय' मोहीम एक आशेचा किरण ठरत आहे.

Post a Comment

0 Comments