📍 सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
आज बीड जिल्हा नियोजन समितीची (DPDC) महत्त्वपूर्ण बैठक मा. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राजी अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, लोकनेत्या मा.ना.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहून विविध विभागातील मागण्यांवर चर्चा केली.
या बैठकीत मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासाच्या गरजा ठोसपणे मांडल्या. लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आरोग्य सुविधांवर वाढता ताण लक्षात घेता माझ्या मतदारसंघात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) सुरू करण्यासाठी होळ, काळेगाव घाट, सोनीजवळा, बोरिसावरगाव, येवता व पाटोदा या ठिकाणी प्रस्ताव नियोजन समितीतून शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. तसेच सासुरा, उमरी, भालगाव, कोरडेवाडी, आरणगाव, बोरगाव, कानडीबदन, पिपळगव्हाण, तरनळी, घाटेवाडी व बोरिसावरगाव येथे नवीन आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्याबाबत ठराव घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
SRT मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक औषधे व यंत्रसामग्री खरेदीकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय (CS) बीड येथे औषध खरेदी व रुग्णसेवा सुविधा बळकट करण्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली.
वन विभागांतर्गत अंबाजोगाई येथे इको-टुरिझम प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.
गृह विभागांतर्गत अंबाजोगाई येथे शासनमान्य नवीन कारागृह प्रकल्पासाठी काळवटी शिवारातील सुमारे ३० एकर जागेवर प्रथम संरक्षण भिंत उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी सादर करण्यात आलेल्या सुमारे ५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील रस्ते व पूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामीण मार्ग व इतर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम विभागास मोठ्या प्रमाणात निधी देण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
सामान्य प्रशासन विभागांतर्गत शासकीय इमारतींमध्ये संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे, संगणक सुविधा, गळती दुरुस्ती, पार्किंग व्यवस्था व विद्युत कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
जलसंधारण विभागांतर्गत अतिवृष्टीमुळे सीनाब, गात, पात, कोपब यांसारख्या विविध कामांचे नुकसान झाले असून त्यांची दुरुस्ती व नवीन कामे हाती घेण्यासाठी राज्य व जिल्हा परिषद स्तरावर निधीची तरतूद करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.
नगरपालिका प्रशासनांतर्गत अंबाजोगाई नगरपरिषदेस शहरातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
याशिवाय शिक्षण, महिला व बालकल्याण, क्रीडांगण, ऊर्जा, पंचायत विभाग, वन विभाग तसेच इतर सर्व विभागांना वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून बीड जिल्ह्याचा सर्वांगीण व संतुलित विकास साधता येईल, अशी भूमिका मी बैठकीत ठामपणे मांडली.
या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments