के के वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ, म्यॅफिक २०२६ हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीच्या परंपरेनुसार संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांपैकी एका यशस्वी व्यक्तिमत्त्वाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. यावर्षी ही संधी विद्युत अभियांत्रिकी विभागाला लाभली.
विद्युत अभियांत्रिकी विभागाचे २००२ सालचे माजी विद्यार्थी, डॉ. रितेश नेहेते (Ritesh Nehete) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम दुपारच्या सत्रात असल्याने त्यांच्याशी मनमोकळी गप्पा मारण्याची संधी मिळाली. विभागाला भेट देतांना त्यांनी सध्याच्या प्राध्यापकांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांशीही आत्मीयतेने विचारांची देवाणघेवाण केली.
त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणादरम्यान तिसऱ्या सेमिस्टरमध्ये ‘मॅथेमॅटिक्स-III’ हा विषय त्यांना बॅकलॉग म्हणून राहिला. परंतु त्यांनी त्या अपयशाला निराशेचे कारण न मानता, “जे घडते ते चांगल्यासाठीच,” या भावनेने स्वीकारले.
याच काळात एका छोट्या अपघातामुळे त्यांना एक संपूर्ण सेमिस्टर घरी विश्रांती घ्यावी लागली. डॉक्टरांनी पूर्ण बेडरेस्ट सांगितले होते. परंतु त्यांनी या विश्रांतीलाही संधी मानले. प्रेरणादायी लेख, पुस्तके आणि विचार वाचण्यास सुरुवात केली. त्या काळात वर्तमानपत्रातील ‘युवा सकाळ’ या पुरवणीत प्रसिद्ध होणारे शिव खेरा यांचे प्रेरणादायी विचार त्यांनी एका डायरीत नोंदवून ठेवले. हीच डायरी त्यांच्या आयुष्यातील खरी प्रेरणागाथा ठरली.
अभियांत्रिकी पदवीमध्ये थोड्या मार्कांनी त्यांचा फर्स्ट क्लास हुकला, तरी सातव्या सेमिस्टरमध्येच त्यांना नोकरीची संधी मिळाली. ज्या कंपनीमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली, त्याच कंपनीने त्यांना नोकरीची ऑफर दिली. कंपनीने स्पष्ट शब्दांत सांगितले, “तुझे गुणपत्रक नव्हे, तर तुझे काम आणि तुझी जिद्द आमच्यासाठी महत्त्वाची आहे.”
त्यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण वाक्य उच्चारले “इंजिनिअरिंगचे मार्क्स माझे करिअर किंवा माझे आयुष्य ठरवू शकत नाहीत.”
पुढील काही वर्षे त्यांनी विद्युत क्षेत्रात कार्य करत अनुभव संपादन केला. त्यानंतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (IT) नवी दिशा शोधत त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर स्थान मिळवले. थोडक्यात एका शिकाऊ अभियंत्यापासून (ट्रेनी इंजिनिअर पासून), एका आयटी क्षेत्रातील संचालक पदापर्यंत भरारी घेतली.
या सर्व प्रवासात त्यांना वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवर अनेक गंभीर अडचणींना सामोरे जावे लागले. वैद्यकीय समस्यांमुळे जवळपास १४–१५ वर्षे त्यांनी असंख्य रात्री जागून काढल्या. तरीही त्यांनी धैर्य, संयम आणि सकारात्मकतेच्या बळावर यशस्वी करिअर घडवले. त्यांच्या आयुष्याची ही कहाणी म्हणजे संकटांवर मात करून उभं राहण्याचं जिवंत उदाहरण आहे.
पारितोषिक वितरण सोहळ्यात त्यांनी व्यक्त केलेले विचार शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या भाषणातील काही वाक्ये विशेष लक्षात राहणारी आहेत, जसे की 'तुमच्या समस्यांना तुमच्यापेक्षा मोठं होऊ देऊ नका; त्या समस्यांवर मात करायची असेल, तर स्वतःला अधिक मोठं बनवा.',
याच अनुषंगाने त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला, ‘Fail early to recover fast’. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कितीही वेगाने प्रगती करत असली, माणूस हा केंद्रस्थानी राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही पदवीपेक्षा कौशल्याला अधिक महत्त्व राहणार आहे. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि सातत्याने शिकत राहण्याची मानसिकता हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजही त्यांचा उत्साह, सकारात्मक दृष्टीकोन आणि संस्थेबद्दलची आपुलकी प्रशंसनीय आहे. विभाग, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी भविष्यातही काही विधायक कार्य करण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. असे माजी विद्यार्थी हीच आपल्या विभागाची आणि संस्थेची खरी दौलत आहे.
डॉ. रितेश नेहेते यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांचे यश, जिद्द आणि प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांसाठी सदैव दीपस्तंभ ठरावी, हीच अपेक्षा.

Post a Comment
0 Comments