गडचिरोली, (जिमाका) दि. 14 : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोली येथील ‘सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’ येथे सदिच्छा भेट देऊन समाजसेवक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्याशी राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील सुधारणांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य आव्हानांवर उपाययोजना, शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि गडचिरोली मॉडेल राज्यभर राबविण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सकारात्मक संवाद झाला.
हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी टास्क फोर्स मॉडेल
डॉअभयबंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात हिवताप कमी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती मंत्र्यांना दिली. दुर्गम व आदिवासी भागात प्रभावी सर्वेक्षण, तात्काळ निदान व उपचार, समुदाय सहभाग आणि स्थानिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या मदतीने हिवतापाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. हिवताप शून्यावर आणण्यासाठी टास्क फोर्स पद्धतीचा राज्यभर अवलंब करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गृहआधारित नवजात संगोपन
राज्यातील, विशेषतः आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी गृहआधारित नवजात अर्भक संगोपन (HBNC) या पद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. नवजात शिशूंची घरच्या घरी तपासणी, माता-जागरूकता आणि तातडीची वैद्यकीय मदत यामुळे बालमृत्यू दरात घट साध्य झाल्याचा अनुभव डॉ. बंग यांनी मांडला. या मॉडेलचा अधिक व्यापक विस्तार करण्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
लोकाभिमुख आरोग्य धोरणासाठी शासन कटिबद्ध
डॉ. बंग दाम्पत्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांचा गांभीर्याने विचार करून राज्यातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, लोकाभिमुख व सर्वसमावेशक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ना. आबिटकर यांनी स्पष्ट केले. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी शोधग्राममधील विविध आरोग्य सुविधा, प्रशिक्षण पद्धती आणि समुदाय सहभागाच्या उपक्रमांची पाहणी केली तसेच डॉ. अभय बंग व #डॉराणीबंग यांच्या कार्याचे कौतुक केले.
तत्पूर्वी धानोरा तालुक्यातील पवनी येथे आरोग्य मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. धानोरा येथील रुग्णालयात देवाजी तोफा यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments