Type Here to Get Search Results !

महाशिवरात्री उत्सवात प्रकाशा येथे भक्तिरसाचा महासागर; आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते महाआरती संपन्न..

  महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त गौतमेश्वर महादेव मंदिर येथे भव्य महाआरती व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवी वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते विधिवत महाआरती संपन्न झाली.


महाशिवरात्री निमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. “हर हर महादेव”च्या गजरात व मंत्रोच्चारांच्या मंगल ध्वनीत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. दिवसभर रुद्राभिषेक, शिवलिंग पूजन, भजन-कीर्तन व धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी आयोजित महाआरती सोहळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आमदार राजेशदादा पाडवी यांनी भगवान महादेवांचे विधिवत दर्शन घेत अभिषेक व पूजन केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने महाआरती पार पडली. या प्रसंगी उपस्थित भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिभावाने आरतीत सहभाग नोंदवला.

यावेळी आमदार पाडवी यांनी मंदिर परिसरातील नागरिक व भाविकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि विकासासंबंधी मागण्या जाणून घेतल्या. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंदिर परिसराच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

या धार्मिक सोहळ्यास स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रकाशा येथे भक्तिरसाचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. शांतता व उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

महाशिवरात्रीच्या या भव्य सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून, भाविकांनी समाधान व आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments