मराठवाड्यातील रेल्वे विकासाला गती देण्याच्या दृष्टीने आणि रेल्वे प्रश्न मार्गी लावण्याचे अनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णवजी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. नांदेड रेल्वे विभागांतर्गत असलेले रेल्वेच्या अनेक मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्र्यांना दिले. या सर्व मागण्या मान्य कण्यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न करू असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिला आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक सुधारित करण्यात यावे , धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.
उमरी रेल्वे स्थानकावर नरसापूर–नगरसोलसह चार महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी करताना संत दासगणू महाराजांच्या समाधीस्थळाच्या निकटतेचा उल्लेख करण्यात आला. भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर गोरठा गेट अंडरब्रिज क्र. १६४ ची जीर्ण अवस्था लक्षात घेता त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
गेल्या दशकभरात धर्माबाद स्थानकावर कोणत्याही नव्या एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाडीला थांबा मंजूर झालेला नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. प्रादेशिक समतोल विकासाच्या दृष्टीने रामेश्वरम्–ओखा, नांदेड–संबलपूर, नांदेड–विशाखापट्टणम तसेच हैदराबाद–जयपूर या प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली.
नांदेड रेल्वे विभागात विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतरही मेमू कारशेडचा अभाव असल्याकडे लक्ष वेधून स्थानिक अनुरक्षण सुविधा उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भविष्यातील औद्योगिक विस्तार व वाढत्या मालवाहतुकीचा विचार करता पूर्ण विकसित इलेक्ट्रिक लोकोशेडची स्थापना ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या सर्व प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास नांदेड रेल्वे विभागाला नवी गती प्राप्त होईल व मराठवाड्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीस ठोस अधिष्ठान मिळेल. रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णवजी यांनी सर्व विषयांवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment
0 Comments