Type Here to Get Search Results !

डीएलआयसी बैठकीत उद्योग व बँकिंग सेवांबाबत महत्त्वाचे निर्देश..

📍 नंदुरबार | दिनांक : 11.02.2026


जिल्ह्यातील उद्योग प्रोत्साहन, रोजगार निर्मिती तसेच बँकिंग सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा स्तरिय डीएलआयसी (District Level Implementation Committee) बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल उपस्थित होते.

बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकरणांचा विलंब टाळून जिल्ह्याला दिलेले लक्ष्य वेळेत पूर्ण करण्यासाठी शाखानिहाय प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी एलडीएम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, बँक व्यवस्थापक व जिल्हा समन्वयक यांनी दररोज समन्वय साधून चालू महिन्याच्या अखेरपर्यंत उर्वरित प्रकरणे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय जिल्ह्यात बँकिंग सेवा अधिक सुलभ व व्यापक करण्यासाठी नवीन शाखा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. वित्तीय सेवा विभाग (DFS) व राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) यांनी निश्चित केलेल्या लक्ष्यानुसार प्रलंबित शाखा दिनांक 30 जून 2026 पर्यंत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. याबाबत एलडीएम कार्यालयामार्फत प्रगती अहवाल SLBC कडे सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच संबंधित बँका, जिल्हा समन्वयक व विभागांनी नियमित साप्ताहिक आढावा बैठका घेऊन कामकाज गतीमान करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सौ. कल्पना ठुबे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. रवींद्र मोरे, एलडीएम श्री. नंदकुमार पैठणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. एन. पी. पाटील तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

या बैठकीमुळे उद्योग, स्वयंरोजगार व बँकिंग सेवा अधिक सक्षम होऊन जिल्ह्यात आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.




Post a Comment

0 Comments