त-हाडी (ता. शिरपूर),
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त-हाडी येथे ग्रामपंचायत व शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच संपूर्ण गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. भगवे ध्वज, जयघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि शिवभक्तांची गर्दी यामुळे गावात उत्सवाचे तेज पसरले होते.
शिवजयंतीनिमित्त गावातील शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व दुधाचा अभिषेक करण्यात आला. हा अभिषेक सामाजिक कार्यकर्ते दादासो. विजय सोनवणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी देविदास धाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांची उधळण करत शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
यानंतर गावातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य शिवजयंती रॅली काढण्यात आली. हातात भगवे ध्वज, डोक्यावर पगडी, मावळ्यांच्या वेषातील विद्यार्थी आणि शिस्तबद्ध रचनेत निघालेली रॅली पाहून नागरिक भारावून गेले.
“जय भवानी, जय शिवाजी”, “शंभूराजे की जय”, “जिजाऊ मातेचा जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
रॅलीदरम्यान मावळ्यांच्या वेषातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विशेष आकर्षण ठरले अवघ्या सहा वर्षांच्या वेद डामरे या चिमुकल्याची शिवगर्जना. त्याच्या जोशपूर्ण घोषणांवर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या प्रसंगाने शिवजयंतीचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.
शिवजयंतीनिमित्त महाराजांचे शूर अंगरक्षक जीवा महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सामाजिक समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी जननायक बिरसा मुंडा, शौर्य व निष्ठेचे प्रतीक वीर एकलव्य, आदिकवी महर्षी वाल्मिकी आणि लोककल्याणकारी राजकारणाचे आदर्श राजमाता अहिल्याबाई होळकर यांनाही अभिवादन करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तप्रिय, उत्साही आणि आनंदमय वातावरणात शिवजयंती साजरी झाली.
शिवजयंती हा केवळ उत्सव नसून स्वराज्य, शौर्य, न्याय आणि प्रेरणेचा संदेश देणारा दिवस आहे, असे प्रतिपादन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments