स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच! कवाडी पारधी वाड्यावर अधिकाऱ्यांचा दौरा, विशेष राजस्व शिबीराचे आश्वासन आर्वी, वर्धा जिल्हा: 'क्रांतिवीर समशेर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रे'च्या माध्यमातून पारधी समाजात शिक्षणाची क्रांती घडवण्याचे प्रयत्न सुरू असताना, आर्वी तालुक्यातील कवाडी पारधी बेड्यावर एक ऐतिहासिक आणि भावनिक दौरा पार पडला. या यात्रेच्या आयोजकांच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे पारधी समाजातील शिक्षणाचा प्रसार, बालविवाह व जातपंचायत यांसारख्या अनिष्ट प्रथा दूर करणे आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हे उद्दिष्ट साध्य होत आहे.
या यात्रेच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धेत विजयी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना एकात्मिक विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य भेट दिली..
वर्धा जिल्ह्यातील ५३ हून अधिक पारधी बेड्यांवर प्रबोधन केले जात असून, आर्वी तालुक्यातील कवाडी बेड्यावरील ही भेट विशेष महत्त्वाची ठरली. स्वातंत्र्यानंतर आर्वी उपविभागातील पारधी बेड्यांवर इतक्या स्तरावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती ही पहिलीच घटना आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट आणि मार्गदर्शन
सन्माननीय आर्वी उपविभागीय अधिकारी श्री. विश्वास शिरसाठ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी गीतांजली निकम, तहसीलदार हरिदास काळे आणि सहायक प्रकल्प अधिकारी धवांजेवार यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी कवाडी पारधी बेड्यावर प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी समाजबांधवांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अमूल्य मार्गदर्शन केले.
या बेड्यावर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले. येथे घरकुल, मालकी पट्टे, शासकीय कागदोपत्री, शौचालय, पक्के रस्ते, नाल्या, वीज आणि अंगणवाडी यांसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. तरीही शिक्षणाची ज्योत पेटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भेटीदरम्यान एकूण २२ विद्यार्थी शाळाबाह्य आढळले (मागील दिवशी २१, आज आणखी एक नवीन जोडला गेला).
पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची पूर्ण सहमती दर्शवली. अधिकाऱ्यांनी सर्व समस्या जाणून घेत लवकरच विशेष राजस्व शिबीर आयोजित करून प्रमाणपत्र वाटप, जमीन, पाणी, रस्ते, निराधार योजना इत्यादी मुद्द्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले. हे शिबीर पारधी समाजाच्या विकासासाठी क्रांतिकारी ठरेल, अशी अपेक्षा आहे.
समाजातील उत्साह आणि क्रांती
"शस्त्राकडून शास्त्राकडे" आणि "नको फासे, नको जाळे; लेकीला पाठवू आता शाळेत" अशा घोषणांनी बेड्यावर नवउत्साह निर्माण झाला. क्रांतिवीर समशेर सिंग पारधी यांच्या अमर बलिदानाची प्रेरणा घेऊन ही यात्रा पुढे सरकत आहे. या भेटीने समाजबांधवांच्या डोळ्यात आशेचा दिवा पेटवला असून, ही परिवर्तनाची खरी सुरुवात ठरली आहे.
क्रांतिवीर समशेर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रा आयोजकांच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! ही यात्रा प्रत्येक पारधी बेड्यावर शिक्षणाची पहाट उजाडेल, असा निर्धार आहे.

Post a Comment
0 Comments