दोंडाईचा शहरातून वाहणाऱ्या अमरावती नदीच्या संवर्धनाचा संकल्प आम्ही सर्वांनी एकदिलाने केला आहे. या उपक्रमासाठी नगरपालिका, दोंडाईचातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत नदी संवर्धन समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या सदस्यांसह जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नगरपालिका इमारतीत पार पडली. बैठकीनंतर प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी करून सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
दोंडाईचा शहराच्या मध्यभागातून वाहणारी अमरावती नदी काही वर्षांपूर्वी अतिशय स्वच्छ आणि बारमाही वाहणारी होती. नदीत सतत पाणी असायचे आणि परिसर हिरवाईने नटलेला असायचा. मात्र काळाच्या ओघात नदी कोरडी पडली आणि तिच्या पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि नदीला पुन्हा तिचे पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी दोंडाईचाकर सरसावले आहेत.
बैठकीत नदीत पाणी साठवण्यासाठी योग्य ठिकाणी बंधारे बांधणे, नदीचे खोलीकरण करणे, गाळ काढणे, तसेच अशा विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. यावेळी जलसंधारण विभागाचे अधिकारी, नदी संवर्धन समितीचे सदस्य, नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नदीचे संवर्धन आणि सुशोभीकरण करून तिच्यात बारमाही पाणी राहावे, नदीकाठावर सुंदर घाट उभारले जावेत, नागरिकांना फिरण्यासाठी आणि बोटिंगसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हे आमचे स्वप्न आहे. एकत्रित प्रयत्न, नियोजन आणि जनसहभागाच्या जोरावर हे स्वप्न नक्कीच साकार करू, असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला.

Post a Comment
0 Comments