Type Here to Get Search Results !

हळदी-कुंकूच्या निमित्ताने महिलांचा स्नेहमेळावा; नगरसेविका सौ. ममताताई हेमराज पवार यांचे प्रेरणादायी मनोगत

शहादा प्रतिनिधी 

शहादा शहरातील संत सेना भवन येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात नगरसेविका सौ. ममताताई हेमराज पवार यांनी भावनिक व प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मातांनो, भगिनींनो आणि मैत्रिणींनो असे संबोधत त्यांनी सर्व महिलांचे मनःपूर्वक स्वागत केले.


मनोगतात त्या म्हणाल्या की, हळद व कुंकू हे आपल्या संस्कृतीतील सौभाग्य, आरोग्य आणि मंगलतेचे प्रतीक असून, हळदीसारखे आयुष्य सदैव तेजस्वी राहो आणि कुंकवासारखे सौभाग्य कायम आपल्या सोबत नांदो, हीच या कार्यक्रमामागची भावना आहे. हळदी-कुंकू हा केवळ एक सण नसून, आपुलकी, स्नेह आणि स्त्री-स्त्रीतील नातं अधिक दृढ करणारा सुंदर संस्कार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आजच्या धावपळीच्या जीवनात असे कार्यक्रम महिलांना नवचैतन्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देतात. आजची स्त्री घर सांभाळतानाच समाजालाही योग्य दिशा देत असून, प्रत्येक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. अशा सर्व कर्तृत्ववान महिलांना या पावन प्रसंगी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

हा हळदी-कुंकू कार्यक्रम उपस्थित सर्व महिलांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो, अशी सदिच्छा व्यक्त करत सौ. ममताताई पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास शहादा शहरातील गुजर नाभिक समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने विशेष उपस्थिती दर्शवली, त्यामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे व आपुलकीचे वातावरण लाभले.

Post a Comment

0 Comments