Type Here to Get Search Results !

बोराडी येथील के.व्ही.पी.एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशनमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व गौरवशाली वातावरणात साजरा

बोराडी प्रतिनिधी 

किसान विद्या प्रसारक संस्था संचलित के.व्ही.पी.एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन, बोराडी येथे आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध नियोजनात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय पर्वानिमित्त महाविद्यालय परिसर राष्ट्रध्वज, फुगे व सजावटीने सुशोभित करण्यात आला होता.


या प्रसंगी महाविद्यालयाच्या आवारात भव्य ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच डी. फार्मसी, बी. फार्मसी व एम. फार्मसी या सर्व अभ्यासक्रमांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” , “वंदे मातरम्” व “जय हिंद” अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. त्यानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. या क्षणी उपस्थितांच्या चेहऱ्यावर देशाविषयी अभिमान व उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता.

यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित भाषणे, समूहगीत, नृत्य सादरीकरण तसेच प्रेरणादायी सादरीकरणातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, संविधानाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका प्रभावीपणे मांडली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व विशद केले. भारतीय संविधान हे देशाच्या एकता, समता व बंधुतेचे प्रतीक असून संविधानाने दिलेले हक्क व कर्तव्य यांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. फार्मसीसारख्या व्यावसायिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेम जोपासावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

आरोग्य क्षेत्रात फार्मसी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, भविष्यात समाजसेवेसाठी आणि राष्ट्रसेवेसाठी कार्य करण्याची तयारी आजच्या विद्यार्थ्यांनी करावी, असेही मान्यवरांनी नमूद केले. शिक्षण संस्थांमधूनच सक्षम, जबाबदार व संवेदनशील नागरिक घडतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साह, अभिमान व राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवित हा राष्ट्रीय सण साजरा केला. कार्यक्रमाची सांगता “जय हिंद” व “भारत माता की जय”च्या घोषणांनी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments