तऱ्हाडी (ता. शिरपूर) : ज्ञानेश्वर सैदाणे
तऱ्हाडी गावात पोर्णिमा निमित्त दरवर्षी परंपरेने साजरा होणारा खंडेराव महाराज यात्रा उत्सव यावर्षीही मोठ्या भक्तिभावात, उत्साहात व सामाजिक जाणिवेतून साजरा होणार आहे. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी हा भव्य यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला असून, याबाबतची माहिती खंडेराव महाराज यात्रा उत्सव समिती व ट्रस्ट यांच्याकडून देण्यात आली आहे.
खंडेराव महाराजांवर नितांत श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी ही यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नवस-संकल्प, मान-फेड, पालखी दर्शन, पूजाअर्चा यासाठी परिसरातील तसेच दूरदूरच्या गावांतील भाविक मोठ्या संख्येने तहाडी येथे दाखल होतात. यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण गाव भक्तीमय, उत्सवी व मंगलमय वातावरणाने भारून जातो.
यात्रा काळात पालखी मिरवणूक, अभिषेक, महापूजा, आरती यांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा यांसह आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी हॉटेल व्यावसायिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजक तसेच किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. घरगुती वापराच्या वस्तू, संसारोपयोगी साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थ आदींची दुकाने उभारली जाणार असून यात्रेमुळे परिसराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते.
भाविकांच्या मनोरंजनासाठी यात्रेच्या एका दिवशी रात्री पारंपरिक तमाशाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा असून, या कार्यक्रमामुळे यात्रेच्या आनंदात आणखी भर पडणार आहे.
यात्रा उत्सवाच्या निमित्ताने धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे आयोजन व संयोजन स्वर्गीय मुकेशभाई पटेल ब्लड सेंटर, शिरपूर यांच्या वतीने करण्यात येणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जात असून, या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध होणार आहे. भाविक व तरुणांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शिबिरासाठी आवश्यक वैद्यकीय तज्ज्ञ, उपकरणे व सुरक्षिततेची संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे.
खंडेराव महाराज यात्रा उत्सव शांतता, शिस्त व भक्तिभावात पार पडावा यासाठी यात्रा समिती, ट्रस्ट व ग्रामस्थांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
खंडेराव महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान लाभो, अशी भाविकांची भावना असून, तहाडी येथील खंडेराव महाराज यात्रा उत्सव यावर्षीही धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण असा भव्य व दिमाखात साजरा होणार आहे.

Post a Comment
0 Comments