बामखेडा येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत, वारकरी संप्रदायातील थोर संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील नाभिक समाजातील पुरुष, महिला भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात समाजातील ज्येष्ठ व वरिष्ठ व्यक्तींच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मनिष सोनवणे यांनी केले. त्यांनी आपल्या शैलीत संत सेना महाराजांच्या ‘आम्ही वारीक वारीक, करू हिजमत बारीक’ या प्रसिद्ध अभंगाचा अंतर्निहित अर्थ सांगत, 'आपले कर्म हीच खरी ईश्वरसेवा' हा संत सेना महाराजांचा संदेश उपस्थितांपुढे मांडला.
त्यानंतर झालेल्या बौद्धिक सत्रात वैष्णवी उमेश सोनवणे व दर्श दीपक सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून संत सेना महाराजांच्या जीवनचरित्रावर व त्यांच्या महान विचारसरणीवर प्रकाश टाकला. संत सेना महाराजांनी भक्ती आणि कर्तव्याचा सुंदर मेळ कसा घातला, हे त्यांनी आपल्या भाषणातून प्रभावीपणे स्पष्ट केले.
या पुण्यतिथी सोहळ्यास बापू दादा सोनवणे, उमेश सोनवणे, हिरालाल सोनवणे, यश सोनवणे, दीपक सोनवणे, यश विकास सोनवणे यांच्यासह गावातील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व समाज बांधवांनी एकत्र येत संत सेना महाराजांच्या जयघोषात आणि अभिवादनाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली.

Post a Comment
0 Comments