मुंबई येथील सुरुची या शासकीय निवासस्थानी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे अधिकारी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांनी योजनेअंतर्गत समाविष्ट उपचार तातडीने व मिशन मोडवर सुरू करावेत. शासकीय रुग्णालयांमार्फत योजना प्रभावीपणे राबविल्यास शासनाचा निधी थेट सरकारी रुग्णालयांना उपलब्ध होईल. या निधीच्या माध्यमातून रुग्णालयांचे सक्षमीकरण होऊन पायाभूत सुविधा सुधारतील तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक चांगला प्रोत्साहन भत्ता देणे शक्य होईल.अशा सूचना दिल्या.
तसेच राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना मिशन मोडवर प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात यावी, योजनेशी संलग्नित शासकीय रुग्णालयांचा गेल्या सहा महिन्यांतील प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.
त्याचबरोबर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी न्यूरो, कॅन्सर आणि अस्थिरोग (ऑर्थो) विभागांसाठी वाढीव पॅकेजचा प्रस्ताव तयार करण्यास तसेच PET-Scan सारख्या अत्याधुनिक सुविधांसाठी आवश्यकतेनुसार सामंजस्य करार (MoU) करण्याबाबतही सूचना दिल्या.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयकांनी अधिक सक्रिय भूमिका बजावावी. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, खासदार तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित क्षेत्रीय भेटी देऊन सनियंत्रण करावे, असेही यावेळी नमूद केले.
रुग्णालयांना प्राप्त होणाऱ्या कॉर्पस फंडचा विनियोग पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी व्हावा. यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या असून शासकीय रुग्णालयांनी आत्मनिर्भर बनून दर्जेदार व विश्वासार्ह आरोग्य सेवा देणे अपेक्षित असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्यापक प्रसिद्धी करण्यावरही भर देण्यात यावा. योजनेचा टोल-फ्री क्रमांक सर्व शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करावा, अशा सूचना बैठकीत दिल्या.
या बैठकीस आमदार डॉ. अशोक माने, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक (पुणे) डॉ. विजय कंदेवाड तसेच विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments