Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात मार्च ते मे दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन..

 डॉ. मित्ताली सेठी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियान (टप्पा क्र. 1) राबविण्यात येणार असून माहे मार्च ते मे 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळ, नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


लोकहितदक्ष महसूल प्रशासनाचा पुढाकार

ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न त्वरित सोडविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तक्रारींचे निवारण करून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी या शिबिरांचे नियोजन केले आहे. 

शिबिराच्या तारखा आणि नियोजन

हे अभियान खालील निश्चित तारखांना राबविले जाईल:

• मार्च : 7, 14, 20 आणि 27 मार्च

• एप्रिल : 2, 10, 17 आणि 24 एप्रिल

• मे : 8 आणि 15 मे

शिबिरांचे निश्चित ठिकाण आणि अंतिम नियोजन संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि नोडल अधिकारी यांच्यामार्फत जाहीर केले जाईल. 

शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सेवा:

या समाधान शिबिरांमध्ये एकाच छताखाली अनेक कामे मार्गी लावली जाणार आहेत, ज्यात प्रामुख्याने:

• प्रलंबित फेरफार निकाली काढणे व 7/12 दुरुस्ती करणे.

• डिजिटल 7/12, 8-अ आणि विविध दाखल्यांचे (उत्पन्न, रहिवास, जात, नॉन-क्रिमिलेअर) वाटप. 

• अकृषिक तरतुदी संदर्भातील सुधारणाबाबत जनतेला मार्गदर्शन करणे.

• संपुष्टात आणलेल्या सनद प्रणालीबाबत मार्गदर्शन व सुधारणा याबाबत जनजागृती करणे.

• भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे.

• विद्यार्थ्यांना शाळेतच दाखल्यांचे वितरण. 

• इ-मोजणी, ॲग्रीस्टॅक आणि पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शन. 

• सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ आणि दिव्यांगांना दाखले देणे. 

• तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे प्रलंबित कामांचा निपटारा करणे.

• पाणंद रस्त्यांचे आदेश आणि 'सर्वांसाठी घरे' अंतर्गत पट्टे वाटप. 

या अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले महसूल विषयक प्रश्न सोडवून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वयक केले आहे.



Post a Comment

0 Comments