बोराडी (ता. शिरपूर, जि. धुळे) – किसान विद्या प्रसारक संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन, बोराडी येथील डी. फार्मसी, बी. फार्मसी व एम. फार्मसी महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, तरुणींमध्ये आरोग्य जागरूकता आणि महिला सक्षमीकरण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शतायु आयुर्वेद चिकित्सालयाच्या डॉ. कविता व्ही. पाटील (एम.डी. आयुर्वेद) उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे यावर सविस्तर माहिती दिली. तरुणींमध्ये वाढत्या प्रमाणात दिसून येणाऱ्या सामान्य मानसिक आरोग्य समस्या, पीसीओ (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम), अशक्तपणा, मासिक पाळीचे आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन यासारख्या विषयांवर त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण कसे होऊ शकते, याबाबतही त्यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमात द्वितीय वर्ष बी. फार्मसीची विद्यार्थिनी हेमांगी बडगुजर हिनेही आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षणासोबतच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक तरुणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे तिने आपल्या भाषणातून सांगितले. निरोगी शरीर आणि सकारात्मक विचारसरणीमुळेच महिलांना जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन करता येते, असेही तिने नमूद केले.
महिला सशक्तीकरणाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध मनोरंजक व प्रेरणादायी खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला रंगत आणली. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, एकजूट व नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांचे शिक्षण व सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ यांनीही विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. हर्षदा वाघ व प्रा. सुनैना मनूरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समिक्षा कोतकर व नेहा भामरे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या नियोजनात व अंमलबजावणीत महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे तसेच नगरसेवक रोहित रंधे यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन करत या उपक्रमाचे कौतुक केले.महिला आरोग्य जागरूकता, आत्मविश्वास व सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला.

Post a Comment
0 Comments