नंदुरबार: शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचा दिवस हा भावूक असतोच, पण त्यानंतर पेन्शन आणि इतर लाभांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे अधिक क्लेशदायक असते. कर्मचाऱ्यांची हीच अडचण ओळखून नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे. आता जिल्हा परिषद नंदुरबारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवाविषयक लाभांचे आदेश सन्मानपूर्वक प्रदान करण्यांत आले व यापुढेही सेवा निवृत्त होणा-या कर्मचा-यांना करण्यांत येणार आहेत.
प्रशासनाचा 'कर्तव्य' भाव :-
जिल्हा परिषद नंदुरबारच्या 'याहा मोगी' सभागृहात जानेवारी 2026 अखेर सेवानिवृत्त झालेल्या वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांसाठी दि.02 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना नमन गोयल यांनी स्पष्ट केले की, "कर्मचारी आपल्या आयुष्यातील ३० ते ३५ वर्षे प्रशासनाला देतात. अशा कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे."
काय आहे हा नाविन्यपूर्ण उपक्रम?
• तात्काळ लाभ: सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफ, ग्रॅच्युइटी आणि इतर लाभांचे आदेश हाती दिले जातात.
• फिरफिर थांबणार: लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.
• सन्मानपूर्वक निरोप: केवळ कागदपत्रेच नव्हे, तर शाल, स्मृतीचिन्ह आणि वृक्षारोप देऊन कर्मचाऱ्यांचा गौरव.
उपस्थित मान्यवर आणि सत्कारमूर्ती :-
या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, उदयकुमार कुसुरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे आणि इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्रीमती ललिता भामरे, प्रभाकर ठाकरे, यादव मोरे, साहेबराव रजाळे यांसह अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात कर्मचाऱ्यांनी "जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सन्मान होत असल्याबद्दल" प्रशासनाचे आभार मानले.
नंदुरबार जिल्हा परिषदेने सुरू केलेला हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एक वस्तुपाठ ठरणारा आहे. यामुळे प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेली आत्मीयता दिसून येत आहे.

Post a Comment
0 Comments