Type Here to Get Search Results !

आमदार राजेशदादा पाडवी यांच्या विशेष पुढाकारातून शहाद्यात ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ अंतर्गत भव्य मोफत सहायक साधन तपासणी शिबिर उत्साहात..

शहादा प्रतिनिधी - 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा पाडवी यांच्या विशेष प्रयत्नांतून ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी आयोजित भव्य मोफत सहायक साधन तपासणी शिबिराला शहादा येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी सुमारे दोन हजार महिला व पुरुष लाभार्थ्यांनी नोंदणी करत या उपक्रमाचे स्वागत केले. त्यांपैकी सुमारे एक हजार पात्र लाभार्थ्यांना येत्या महिनाभरात आवश्यक सहायक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


हे शिबिर भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम) कानपूर यांच्या तांत्रिक सहयोगाने पार पडले. तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक पथकाने उपस्थित ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव, काठी, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, वॉकर आदी साधनांची मोजमापे घेतली. या शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या योजनांचा लाभ थेट त्यांच्या दारी पोहोचत असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रदीप ठाकरे, नगरसेविका ममताताई हेमराज पवार, वयोश्री योजनेचे डॉ. किरण पावरा, तालुका अध्यक्ष विश्वास ठाकरे, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, ललित छाजेड,आमदार राजेश दादा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक हेमराजभाई पवार, हरीश पाटील, मुनीश जगदेव, दिपक कोळी, सागर मराठे, रुपाली पवार, चंद्रभान कदम, विनोद जैन, वदना भावसार, रमाशंकर माळी, गणेश पाटील, कार्तिक आप्पा, सुभाष वाघ, सचिन पावरा, सुकलाल रावताळे, प्रशांत कुलकर्णी, , दिपक जयस्वाल, अनिल ठाकरे, प्रितेश भावसार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना स्वावलंबी जीवन जगण्यास मोठी मदत होत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असून, अशा शिबिरांमुळे गरजू नागरिकांना थेट लाभ मिळत आहे.

शिबिराचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. नोंदणी, तपासणी व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते. स्वयंसेवकांनी लाभार्थ्यांना आवश्यक ती मदत करत संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

या उपक्रमामुळे शहादा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी काळातही अशाच लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली

Post a Comment

0 Comments