Type Here to Get Search Results !

शहाद्यासाठी रेल्वे जोडणीचा विकासलढा पुन्हा तीव्र उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई मकरंद पाटील यांचा संसदपर्यंत ठाम आवाज..

 शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणाऱ्या हिंदू रणरागिणी मान. सौ. माधवीताई मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष शहादा नगरपरिषद यांनी शहादा शहराला रेल्वे जोडणी मिळावी, या दीर्घकालीन आणि महत्त्वाच्या मागणीसाठी निर्णायक पाऊल उचलले आहे. आदिवासी, ग्रामीण व शेतकरीबहुल भागाच्या विकासाचा ठाम आणि स्पष्ट आवाज त्यांनी अधिकृत पत्राद्वारे थेट संसदपर्यंत पोहोचवला आहे.


सन २०२२ मध्ये शहाद्यातील काही जागरूक नागरिकांनी पंतप्रधान ‘गतिशक्ती रेल्वे योजनेअंतर्गत’ शहादा शहराला जवळची रेल्वे जोडणी मिळावी, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री मान. श्री. अश्विनीजी वैष्णव यांना निवेदन दिले होते. मात्र, त्या वेळी ही मागणी मांडूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले शहादा शहर आजतागायत रेल्वे सुविधेपासून वंचित आहे.

या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष मान. सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनी पुढाकार घेत शहादा शहराच्या विकासाच्या दृष्टीने रेल्वे जोडणी किती आवश्यक आहे, याबाबत सविस्तर आणि ठोस मांडणी केली आहे. शहादा शहर हे आदिवासी व ग्रामीण भागाचे प्रमुख केंद्र असून शिक्षण, व्यापार, आरोग्य आणि शेतीविषयक व्यवहारांसाठी हजारो नागरिक दररोज ये-जा करतात. मात्र रेल्वे सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे जोडणी केवळ प्रवासाची सोय नसून, ती रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाची, शेतमालाच्या वाहतुकीस चालना देणारी तसेच औद्योगिक आणि व्यापारी विकासाला गती देणारी ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः आदिवासी व शेतकरी समाजासाठी ही सुविधा अत्यंत लाभदायक ठरणार असून संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीस हातभार लावणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शहादा शहराच्या विकासासाठी केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस पाठपुरावा करण्याची भूमिका घेत मान. सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनी रेल्वे जोडणीचा हा विषय पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर नेल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. शहाद्यास रेल्वेची जोडणी मिळावी, ही केवळ मागणी नसून तो जनतेच्या हक्काचा आणि सर्वांगीण विकासाचा लढा असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments