Type Here to Get Search Results !

फार्मर कप 2026 : तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा येथे यशस्वी..

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026 अंतर्गत तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण (दि. 9 ते 11 फेब्रुवारी 2026) उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण झाले. हे निवासी प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा, ता. साक्री, जि. धुळे येथे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी सौ. मीनाक्षी वळवी, कृषी विभागाची संपूर्ण टीम, उमेद अभियानाचे बीएमएम श्री. प्रकाश पाडवी व सहकारी तसेच एसटी महामंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी शेतकऱ्यांची बस रवाना करताना सौ. मीनाक्षी वळवी यांनी शुभेच्छा दिल्या आणि प्रशिक्षण प्रवासाची सुरुवात झाली. 'टेन्शन घेऊ नका, हसत-खेळत शिका' या प्रेरणादायी संदेशाने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण झाली. तीन दिवसांच्या या प्रशिक्षणात जलसंवर्धन, मृदसंवर्धन, सामूहिक नियोजन, गावस्तरीय सहभाग आणि शाश्वत शेती पद्धती यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कृषी नोडल अधिकारी श्री. विलास निकुम तसेच उमेद अभियान प्रतिनिधी श्री. विलास चौधरी यांनी बॅचसोबत उपस्थित राहून शेतकऱ्यांना आत्मीयतेने मार्गदर्शन केले आणि सक्रिय सहभाग नोंदवला.

प्रशिक्षणाच्या समारोपावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यापूर्वी बारीपाडा येथील पद्मश्री श्री. चैत्राम पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026 अंतर्गत जल, जंगल, जमीन, वन आणि निसर्ग संवर्धन यांचे महत्त्व अधोरेखित केले. सामूहिक प्रयत्नांतून गावांचा सर्वांगीण विकास साधता येतो, यावर त्यांनी भर दिला.

शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचा तसेच फार्मर कप स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला.या उपक्रमात एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक श्री. मोरे व श्री. गोस्वामी यांचे विशेष सहकार्य लाभले. नवीन बसची उपलब्धता तसेच चालक-वाहक श्री. पाटील व श्री. गिरासे यांच्या सुरक्षित आणि नियोजनबद्ध प्रवास व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला.

या प्रशिक्षण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments