Type Here to Get Search Results !

ते’ गुलाब सांभाळणं आता सुनेत्राताईंची जबाबदारी...



अजितदादांनी २०२४ मध्ये ट्विट केलेला हा फोटो चर्चेत आला होता. सुनेत्राताई पवार राजकारणात उतरल्या होत्या. अजितदादांनीही गुलाबी जॅकेटच्या माध्यमातून महिलांना केंद्रस्थानी ठेवून वेगळाच गुलाबी राजकीय प्रयोग सुरु केला होता. अन् त्यात पहिल्यांदाच अजित पवारांच्या ट्विटरवर थेट सुनेत्रा पवार या अजित पवारांना गुलाब देतानाचा फोटो ट्विट झाला होता. “मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीने गुलाबाचे फूल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.” असं कॅप्शन फोटोला दिलं होतं. तेच अजितदादांचं गुलाबी राजकारण अन् गुलाब सांभाळत, पक्ष-कुटुंब यांचा गाडा हाकण्याची वेळ सुनेत्रा पवारांवर आलेली आहे.  दादांनी सर्वात मोठा निर्णय घेत सर्व जुळवून सत्तेची घडी बसवली. तीच घडी मोडू द्यायची नसेल. अजितदादांचा तो निर्णय चुकीचा ठरवायचा नसेल, तर सुनेत्रा पवारांना सूत्र हाती घ्यावीच लागतील.

अजितदादा गेल्यानंतर तीन प्रश्न उपस्थित राहतायत... पहिला म्हणजे सत्तेतील राष्ट्रवादीचं भवितव्य काय? अन् दुसरा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येणार का? त्यासोबतच अजितदादांऐवजी कोण? हा तिसरा प्रश्न उभा आहे. कारण अजित पवार हे एकमेव व्यक्ती होते, जे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणून पक्षाचं अन् कुटुंबांचं नेतृत्व करु शकत होते. आता तेच नसल्याने हे तिन्ही प्रश्न राष्ट्रवादी पक्षासमोर आणि पवार कुटुंबियांसमोर आहेत... अन् याच उत्तर सध्या तरी सुनेत्रा पवार हेच दिसतंय... पण यासाठी किती काळ जातोय? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अन् अर्थमंत्री होतेच. पण ते सत्तेतील एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यामुळे सत्तेतला राष्ट्रवादीचा वाटा हा शाबूत ठेवणं, हे पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. तेच उपमुख्यमंत्री भुजबळ, तटकरे किंवा इतर कुणाला देणं... हे लोकांना मान्य होणारच नाही. अजित पवारांच्या घरातीलच व्यक्ती त्या पदावर असणं, हे सत्ताधारी भाजपसाठीही महत्वाचं आहे. पार्थ पवार किंवा जय पवार हे तितके सक्षम नाहीत. किंवा ते पर्याय असूच शकत नाही. त्यांना सक्षम होण्यासाठी तितका वेळ मिळणं आवश्यक आहे. तो वेळ सत्तेत राहून देणं हे त्याहून अधिक आवश्यक आहे. त्यामुळे अजित पवारांचा राजकीय वारसा हा पुढे सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार हेच नाव समोर येतंय. त्यांना पक्षाचं अध्यक्षपद दिलं जाईल, पण त्यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपद दिलं जातं का? की एक राजकीय संधी म्हणून इथेही वेळकाढूपणा केला जातो, हा प्रश्न आहे. अर्थमंत्रीपदावरून मात्र नक्कीच डावपेच हे टाकले जाणार आहेत. 

राहिला प्रश्न दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा तर... अजित पवारांनीच यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं बोललं जातंय. मात्र सध्या तरी आतून चर्चा केली किंवा प्रयत्न केले. तरी त्याचा सत्तेतल्या वाट्यावर परिणाम होणार नाही. याची काळजी नक्कीच घेतली जाईल. पवार हे कुटुंब म्हणून यात कसे निर्णय घेतं. त्यावरही बऱ्याच गोष्टी ठरतील. तसं असलं तरीही पवार कुटुंब म्हणूनसुद्धा अजित पवारांची जागा सध्यातरी सुनेत्रा पवार यांनाच द्यावी असाच प्रयत्न करु शकतात. त्यामुळे एकीकडे पवार कुटुंब अन् दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरेंसह जेष्ठ नेत्यांचं म्हणणं... यावर पक्षाचं भवितव्य ठरणार आहे.

पवार कुटुंब म्हणून नक्कीच अधिक घट्टपणे एकत्र येतील. मात्र राष्ट्रवादी एकत्र आणणं, सध्या तितकं सोप्पं नाही. कारण शरद पवारांची भाजपसोबत सत्तेत येण्यावरून भूमिका काय? यावरच पुढचा निर्णय अवलंबून आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेसुद्धा सत्ता सोडून एकत्र येण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे भाजपसोबत सत्तेत राहून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, हे सर्व शरद पवारांच्याच हातात आहे. 

आता सध्याच्या भावनिक वातावरणात असे पर्याय सर्वांसमोर दिसतायत. पण वेळ निघून जाईल, राजकीय घडामोडी घडतील... कुणी संधी शोधेल तर कुणाचं राजकीय करियर धोक्यात येईल. त्यावरही बऱ्याच गोष्टी ठरतील. आणि विशेष म्हणजे पती गेलाय, तर सुनेत्रा पवारांचीही तितकी मानसिक तयारी असेल का? हाही प्रश्नच आहे...

Post a Comment

0 Comments