ऐतिहासिक वारसा लाभलेले, १९३७ मधील ‘टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहन’ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दल सेवेत पुन्हा दाखल होत आहे ही बाब मुंबईकरांसाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे 'टर्न टेबल शिडी' अग्निशमन वाहना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उद्योजक गौतम सिंघानिया, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सन १९३७ मध्ये निर्मित आणि सन १९४४ मध्ये मुंबई बंदरातील (मुंबई डॉक) मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन (Restoration) करण्यात आले आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या व्हिंटेज अग्निशमन सेवा वाहनाची औत्सुक्याने पाहणी करुन या वाहनाच्या जतन व संवर्धनाबद्दल गौरवोद्गार काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई अग्निशमन दल देशातच नव्हे तर जगातही सर्वात कार्यक्षम अग्निशमन सेवा दल आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळोवेळी बलिदान देऊन नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. या ऐतिहासिक वाहनाच्या मदतीने अनेक अग्निशमन मोहिमा पार पाडल्या. आज हे वाहन नव्या स्वरूपात दाखल होत आहे ही बाब बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासाठी तसेच मुंबईकरांसाठीही गौरवास्पद आहे. अशा जुन्या व ऐतिहासिक विविध वारशांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments