Type Here to Get Search Results !

शहाद्याच्या रणरागिणीचा ठाण्यात सिंहनाद! महानुभाव पंथीयांकडून उपनगराध्यक्षा सौ. माधवीबेन पाटील यांचा ऐतिहासिक सन्मान

शहादा प्रतिनिधी - रविंद्र पावरा 

 शहादा शहराची कणखर ओळख आणि ‘हिंदू रणरागिणी’ शहादा शहराच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवीबेन मकरंद पाटील यांचा ठाणे शहरात भव्य आणि दिव्य सन्मान सोहळा पार पडला. मुंबई महानुभाव पंथीय परिवारातर्फे आयोजित श्री ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा गौरव करण्यात आला.


महानुभाव पंथाच्या या पवित्र अध्यात्मिक प्रवचन सोहळ्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच मंगल व अध्यात्मिक वातावरणात, २५ जानेवारी २०२६ रोजी ठाणे येथे सौ. माधवीबेन पाटील यांचा सन्मानचिन्ह, महानुभाव पंथाचा मानाचा शेला व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांतून उपस्थित असलेले महानुभाव पंथीय साधू-संत, महंत, बाबाजी आणि पंथीय बांधवांच्या साक्षीने पार पडलेला हा सोहळा शहादा शहराचा अभिमान वाढवणारा ठरला. सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक जीवनात सौ. माधवीबेन पाटील यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना सौ. माधवीबेन पाटील यांनी आपल्या मनोगतात भावनिक शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,“माझे आजोळकडील संपूर्ण कुटुंब महानुभाव पंथीय असल्याने लहानपणापासूनच या विचारधारेचे संस्कार माझ्यावर झाले. उपदेशी घराण्याची सून म्हणून कै. आण्णासाहेब पी. के. पाटील यांचाही पंथावर गाढ विश्वास होता. आज येथे उपस्थित असलेल्या सर्व पूजनीय महंतांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानेच मला उपनगराध्यक्षपदाचा हा टप्पा गाठता आला. निवडणुकीच्या काळात माझी अवस्था महाभारतातील अर्जुनासारखी होती आणि माझ्या पाठीशी उभे असलेले सर्वच मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे होते.”

या भव्य सोहळ्याचे आयोजन तरडगाव निवासी राहेरकर बाबा, लोणखेडा निवासी पातूरकर बाबा यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिद्धपूरकर बाबा होते. यावेळी पाचराऊत बाबा, लासूरकर बाबा (जळगाव), न्यायमबास बाबा (मकरधोकडा), हंसराजदादा खामणीकर, समस्त राहेरकर परिवार तसेच शिनाबाई देवस्थान, लोणखेडा येथील पूजनीय महंत मंडळी, मान्यवर, भाविक व पंथीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सन्मान सोहळा म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, शहादा शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाची राज्यस्तरावर झालेली दखल असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments