Type Here to Get Search Results !

भक्ती, संस्कार आणि अध्यात्माचा संगम; गांधीनगरातील भागवत कथा ठरतेय आकर्षण..

शहादा प्रतिनिधी : मनिष सोनवणे

अधिक मासानिमित्त शहरातील गांधीनगर परिसर सध्या भक्तीमय वातावरणाने भारावून गेला असून येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीतिमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज धार्मिक कार्यक्रम, भजन, रास आणि कथामृतामुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा संचारली आहे.


या कथा सप्ताहात मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील कंचनखेडी येथील सुप्रसिद्ध भागवत कथाकार आचार्य अनिलजी शर्मा महाराज दररोज रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान भागवत कथेचे रसाळ निरुपण करत आहेत. आपल्या प्रवचनातून त्यांनी माता-पित्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगत, “जीव मायेत अडकतो, तर ब्रह्माशी जोडला गेल्यावर मुक्त होतो,” असा अध्यात्मिक संदेश दिला.

यासोबतच त्यांनी तरुणांना दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत, मुक्या प्राण्यांना मदत करावी तसेच पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.

शहादा येथील पंकज जांभळे, निलिमा पंकज जांभळे व समस्त जांभळे परिवाराने स्वर्गीय उद्धव जांभळे यांच्या स्मरणार्थ या कथा सप्ताहाचे आयोजन केले आहे. सप्ताहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, भजन आणि आध्यात्मिक उपक्रम होत असून त्यालाही भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे.

सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आकर्षक देखावे सादर करण्यात आले. रास-भजनाच्या कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध झाले. परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने कथेचा आनंद घेत आहेत.

२८ मे रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत अंतिम कथा होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Post a Comment

0 Comments