Type Here to Get Search Results !

नव-तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यात लोककला व पथनाट्याद्वारे प्रभावी जनजागृती....

ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक जागरूकता आणि सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने नव-तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास कार्यक्रम अंतर्गत नंदुरबार तालुक्यात लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती करण्यात आली.


हा उपक्रम Mahila Arthik Vikas Mahamandal (माविम), नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली हेंगात्या महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. या अंतर्गत कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नंदुरबार तालुक्यातील एकूण १० गावांमध्ये आदिवासी महिलांनी आपल्या बोली भाषेचा प्रभावी वापर करून लोककलेद्वारे महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर जनजागृती केली. बालविवाह प्रतिबंध, कुपोषण, स्त्री-पुरुष समानता तसेच महिलांचे संपत्तीवरील हक्क या विषयांवर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी महिलांनी लोकनाट्य आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून प्रभावी संदेश दिला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांनी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच गावपातळीवर सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया अधिक बळकट व्हावी हा होता.

हा कार्यक्रम प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र, नंदुरबार आणि हेंगात्या महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, युवक-युवती, महिला आणि मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. पथनाट्य, प्रशिक्षण सत्र आणि संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान गावातील नागरिकांकडून अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले. त्यामध्ये मुलींच्या शिक्षणाअभावी होणारी शाळा गळती, पारंपरिक रूढी-परंपरा व सामाजिक दबाव, मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांची भीती, कायद्याविषयी अपुरी माहिती तसेच महिला ग्रामसभेबाबत माहितीचा अभाव या बाबी प्रकर्षाने निदर्शनास आल्या.

या जनजागृती कार्यक्रमामुळे गावातील महिलांना स्वतःचे आणि आपल्या मुलींचे हक्क याबाबत सखोल माहिती मिळाली. अनेक गावांमध्ये महिलांनी प्रथमच महिला ग्रामसभेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. तसेच महिलांनी आपल्या घर आणि शेतीवर स्वतःचे नाव लावण्याचा निर्धार केला असून, गावात व कुटुंबात बालविवाह होऊ नये यासाठी सामूहिक शपथ घेतली.

यासोबतच गावातील सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका आणि बाल संरक्षण समिती यांना या विषयांबाबत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. गावपातळीवर संवाद व सक्षमीकरण वाढविण्याची गरज अधोरेखित झाली असून, समिती सदस्यांनी पुढील तीन महिन्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःही पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.

या उपक्रमामुळे गावातील महिला वर्ग, माविम मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी ग्रामसभेत हे मुद्दे मांडून त्यासंदर्भात ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील काळात संबंधित आदेश काढून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या पद्धतीने नंदुरबार तालुक्यातील १० गावांमध्ये लोककला आणि पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी व यशस्वी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले असून, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.



Post a Comment

0 Comments