शहादा नगरपालिका इमारतीच्या शेजारील मुख्य रस्त्यावर अग्रवाल हॉटेल परिसरात गेल्या सुमारे एका वर्षापासून जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती. या सततच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून रस्त्यावर चिखल, खड्डे व घसरड्या परिस्थितीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा नागरिकांनी या समस्येबाबत तक्रारी करूनही प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
अखेर या गंभीर आणि जनहिताच्या प्रश्नाची दखल घेत शहादा नगरपालिकेच्या वतीने संबंधित जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. या दुरुस्ती कामामुळे पाण्याचा अपव्यय थांबणार असून रस्त्याचीही दुरुस्ती करून तो पूर्ववत सुस्थितीत करण्यात येणार आहे.
या कामाची प्रत्यक्ष पाहणी उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, आरोग्य सभापती सुनील पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रदीप ठाकरे, बांधकाम सभापती संतोष वाल्हे तसेच नगरसेवक सागर मराठे उपस्थित होते. पाहणीदरम्यान लोकप्रतिनिधींनी कामाची सद्यस्थिती जाणून घेत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी लोकप्रतिनिधींनी दुरुस्तीच्या कामाबाबत स्पष्ट आणि ठोस सूचना दिल्या. जलवाहिनी दुरुस्तीचे काम दर्जेदार साहित्य वापरून करावे, भविष्यात पुन्हा गळती होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करावे तसेच दुरुस्ती सुरू असताना नागरिकांच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. याशिवाय पाणी गळतीमुळे खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करून तो वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, असेही निर्देश देण्यात आले.
नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणीपुरवठा आणि रस्ते या मूलभूत सुविधांबाबत शहादा नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी सतत जागरूक असून शहरातील प्रलंबित समस्यांवर तातडीने उपाययोजना केल्या जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या दुरुस्ती कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शहरातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment
0 Comments