Type Here to Get Search Results !

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य विभागाच्या विविध बैठका नियमित लसीकरणाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा

 जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. 2 : नियमित लसीकरणाचे उद्दिष्ट मार्चअखेरपर्यंत 100 टक्के पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.


 

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत जिल्हा लसीकरण टास्क फोर्स, जिल्हास्तरीय लोकसंख्या धोरण समन्वय समिती, जन्ममृत्यू नोंदणी जिल्हास्तरीय समन्वय समिती आदी विविध बैठका आज झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शिक्षणाधिकारी रतनसिंह पवार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, तसेच तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

लसीकरण कार्यक्रमात बीसीजी, पोलिओ, हिपॅटायटिस बी, रोटाव्हायरस, पेन्टावॅलेंट, पीसीव्ही, एमआर, डीपीटी आदी 8 लसी दिल्या जातात. लसीकरण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 31 हजार 368 उद्दिष्टापैकी 23 हजार 368 लसीकरण डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित लसीकरण विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले. रोटाव्हायरस, टीटी लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. शाळांतील मुलांचे लसीकरण होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हास्तरीय लोकसंख्या धोरण समन्वय समितीची बैठकही जिल्हाधिका-यांनी घेतली. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तालुका स्तरावर लॅप्रोस्कोपी शिबिरे घेण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिली. जनजागृती वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

जिल्ह्यात जन्म-मृत्यू, अर्भकमृत्यू आदी नोंदी 100 टक्के व्हाव्यात. मूल जन्माला आले की 30 दिवसांत नोंदणी होणे आवश्यक आहे. विलंब झालेल्या नोंदणी विहित मार्गाने आदेश मिळवून व्हाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments