केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. अनेकजण वर्षाानुवर्षे अभ्यास करूनही ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत, मात्र महाराष्ट्राच्या एका तरुणाने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ही किमया साधली आहे. ठाण्याचा रहिवासी असलेला अभिजीत पाटील आता राजस्थान कॅडरचा सर्वात तरुण आयपीएस (IPS) अधिकारी बनला आहे.
पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश अभिजीत पाटील याने 2022 च्या नागरी सेवा परीक्षेत (CSE) अखिल भारतीय स्तरावर 470 वी रँक मिळवली. विशेष म्हणजे, त्याने हे यश कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय, केवळ स्व-अभ्यासाच्या जोरावर मिळवले आहे. वयाच्या 22 व्या वर्षी त्याने हे स्वप्न पूर्ण केले आणि 2023 च्या बॅचमध्ये त्याला भारतीय पोलीस सेवा (IPS) मिळाली. सध्या तो राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील राजगड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून कार्यरत आहे.
महाराष्ट्राशी घट्ट नाते अभिजीत हा मूळचा महाराष्ट्रातील ठाण्याचा आहे. त्याचा जन्म 11 जून 1999 रोजी झाला. त्याचे वडील तुळशीराम पाटील हे मुंबई महानगरपालिकेतून मुख्य लेखापरीक्षक (Chief Auditor) म्हणून निवृत्त झाले आहेत, तर आई आशा देवी यांनी सिंचन विभागात सेवा बजावली आहे. अभिजीत हा आपल्या दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण आणि जडणघडण महाराष्ट्रातच झाली असून, त्याच्या यशाने राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कोळ्या चेहऱ्याचा धडाकेबाज अधिकारी अभिजीत पाटील यांना पाहिल्यानंतर अनेकांना त्यांच्या वयावर विश्वास बसत नाही. त्यांचा चेहरा अतिशय कोवळा आणि लहान मुलासारखा दिसतो, त्यामुळे वर्दीत असताना अनेकदा लोक आश्चर्यचकित होतात. मात्र, कर्तृत्वात ते कोठेही कमी नाहीत. एवढ्या कमी वयात कायदा आणि सुव्यवस्थेसारखी मोठी जबाबदारी ते सक्षमपणे सांभाळत आहेत. देशातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत, जसे की सफीन हसन, आता अभिजीत पाटील यांचेही नाव आदराने घेतले जात आहे.

Post a Comment
0 Comments